महाराष्ट्रात होणार एसटीचा कायापालट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एस टी कर्मचा-यांच्या दृष्टीने प्रमुख मुद्दा असलेला वेतनाचा विषय सोडवावा अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना केली आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एस टी कर्मचा-यांच्या दृष्टीने प्रमुख मुद्दा असलेला वेतनाचा विषय सोडवावा अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई सेंट्रल इथल्या एस टी मुख्यालयामध्ये, एस टी कर्मचा-यांच्या नवीन गणवेश वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
एसटीचा कायापालट होणार
एसटीचा कायापालट येत्या काळात कसा केला जाणार याची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून यावेळी उपस्थितांना देण्यात आली. एसटी महामंडळ 1 मे पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू करत आहे.त्याचसोबत पुरवल्या जाणा-या इतरही सुविधांची माहिती यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
शिवशाही फक्त गाडीवर वर नको तर प्रत्यक्षात कारभारात ही हवी असा सल्ल्ला यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला. दरम्यान एसटी महामंडळाची महाराष्ट्रात 608 बस स्थानकं आहेत. त्यापैकी 568 बस स्थानकं सध्या वापरात आहेत. यातील 80 बस स्थानकांचं नुतनीकरण येत्या वर्षभरात केलं जाणार आहे.
बस स्थानकांवर छोटी चित्रपटगृह
नव्याने बांधण्यात येणा-या काही बस स्थानकांवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून 60 आसनांची छोटी चित्रपटगृह बांधण्यात येणार आहेत. ही चित्रपटगृह केवळ मराठी चित्रपटांसाठी राखीव असतील असं रावते यांनी सांगितलं.