मुंबईतील चेंगराचेंगरीत महिलांसोबत लाज आणणारी घटना
काही तरूण मृत महिलांच्या अंगावरील बांगड्या काढत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
मुंबई : मुंबईवर कोणतंही संकट आलं तर मुंबईकर मदतीसाठी सदैव तयार असतात, मुंबईकरांचं हे स्पिरीट जगभर ओळखलं जातं, मात्र काही समाज कंटकांनी मुंबईकरांना लाज आणणारं कृत्य केल आहे. ही लाजीरवाणी घटना, एलफिन्स्टन-परळ पादचारी पुलावर २९ सप्टेंबर रोजी, चेंगराचेंगरी दरम्यान घडली. कारण यात मृत्यूमुखी पडलेल्या सुजाता शेट्टी आणि सुमलता शेट्टी यांच्या मृतदेहावरील दागिने ओरबाडण्यात आले.
मृतदेहावरील दागिने काढून घेण्याची घटना ही अपघात स्थळीच झाली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण काही तरूण मृत महिलांच्या अंगावरील बांगड्या काढत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
सुमलता आणि सुजाता शेट्टी यांचे शेजारी गणेश शेट्टी यांनी हा फोटो मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री तसेच मुंबईच्या पोलीस कमिश्नर यांना ट्ववीट केला आहे. मात्र अजून काहीही उत्तर आपल्याला आलं नसल्याचं गणेश शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनी बोलताना सांगितलं.
दुसरीकडे दादर पोलीस , तसेच रेल्वे पोलिसांनी या तरूणांचा शोध सुरू केला असल्याचं सांगण्यात येत आहे. घडलेला प्रकार हा अत्यंत लाजीरवाणा असल्याने हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेण्यात येत आहे.
सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत असलेल्या या फोटोमुळे त्या तरूणांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत, मात्र या घटनेशी संबंधित आणखी व्हिडीओ, अथवा फोटोंमध्ये हे तरूण स्पष्टपणे दिसून येतील असा अंदाज आहे.