मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद आहेत. अनेकांच्या परीक्षा देखील होऊ शकलेल्या नाहीत. देशात हळूहळू अनलॉक लागू करत असताना अनेक गोष्टी सुरु होत आहेत. पण शाळा आणि कॉलेज अजूनही बंद आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खाजगी क्लासेस सुरु करण्याची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये बंद असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाच्या काळात शाळा महाविद्यालये सुरू करणे शक्य नाही हे आम्ही समजू शकतो. मात्र त्याला कुठेना कुठे सुरुवात करावी लागेल. त्यासाठी नियमावली तयार करून राज्यातील सर्व खाजगी क्लासेस सुरू करावेत. एकदा का हे क्लासेस सुरू झाले की शाळा महाविद्यालये सुरू करण्यास वेळ लागणार नाही, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा' अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.



'सर्व ठिकाणी ऑनलाइन अभ्यासक्रम घेणे शक्य नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालये चालू करण्याबाबत शासनाने विचार करावा. त्यापूर्वी खाजगी क्लासेस चालू करण्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी. शंभर विद्यार्थ्यां ऐवजी ४० विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी. एकदा का राज्यातील सर्व खासगी क्लासेस सुरळीत चालू झाले की शाळा महाविद्यालये हा शेवटचा टप्पा असून ते सहजपणे सुरू करता येतील. त्यासाठी राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा.' असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.


राज्यातील सर्व खाजगी क्लासेस सुरू केले की, विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ते कमी होण्यास मदत होईल. एकदा भीती गेली की सर्वच गोष्टी सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.