अमित जोशी झी मिडिया मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून मुंबईत सुरुवात होत आहे. थंडीची चांगली अनुभुती देणा-या नागपुर ऐवजी तुलनेत दमट हवामान असलेल्या असलेल्या मुंबईत हिवाळी अधिवेशन पहिल्यांदाच होत आहे. वातावरण कसंही असू दे....यावेळी नेहमीच्या मुद्द्यांपेक्षा आरक्षण या विषयानेच हे अधिवेशन निश्चित गाजणार असंच म्हटलं जातंय.


आरक्षणाचा मुद्दा गाजणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवेळी विधीमंडळच्या अधिवेशनात सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडे भरपूर मुद्दे असतात. तर सत्ताधारी विविध मुद्दे मांडत -निर्णय घेत विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असतात. यावेळच्या दोन आठवडे चालणा-या अधिवेशनात एकच प्रमुख मुद्दा गाजणार आहे तो म्हणजे आरक्षणाचा. 


कायद्यावर टिकणारा मराठा समाजासाठीचा आरक्षणाचा कायदा अधिवेशनात मांडण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे.


पहिल्या आठवड्यातच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चर्चा होत निर्णय केला जाणार आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाची स्थिती सांगणाऱ्या TISS च्या अहवालाबाबत राज्य सरकार निर्णय जाहिर करणार आहे.


मात्र धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकार हिवाळी अधिवेशन संपल्यावर डिसेंबरमध्येच केंद्राला करणार आहे.


या दोन प्रमुख आरक्षणाच्या मुद्दाबरोबर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही डोके वर काढणार आहे.


जोरदार खडाजंगी 


या आरक्षणाच्या प्रमुख मुद्दासह टी वन वाघिणीची हत्या, राज्यातील अघोषित भारनियमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, उत्तर महाराष्ट्र - मराठवाडा पाणी वाटप वाद आणि अर्थात दुष्काळ समस्या अशा मुद्द्यांवरही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी होणार आहे.


त्यातच सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा भार डोक्यावर असलेल्या सरकारला यावेळीही पुरवणी मागण्या मांडायच्या आहेत.


त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन याधीच्या अधिवेशनापेक्षा काहीसं अधिकच गाजणार यात शंका नाही.