राज्य महिला आयोग महिला दिनी देणार महिलांसाठी ‘सुहिता’ ही नवी मैत्रीण
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी जाहीर केले आहे.
मुंबई : ई गव्हर्नसचा जास्तीत जास्त वापर करून महिलांच्या सेवेत अधिक तत्पर होणा-या राज्य महिला आयोगाने आणखीन एक दमदार पाऊल टाकले असून पिडित महिलांशी थेट फोनवर संवाद साधणारी नवी सुहिता नावाची मैत्रिणच आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या नव्या हेल्पलाईनसह दोन पुस्तकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी जाहीर केले आहे.
महिलांना एखाद्या प्रसंगी तातडीने मदत आणि समुपदेशन मिळण्याची गरज असते. ग्रामीण भागातील महिला अनेकवेळा एखाद्या प्रसंगात कधी भितीपोटी तर कधी अज्ञानापोटी आपल्यावर झालेल्या अन्याची वाच्यता कुठे करत नाही. आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत कुणाशी संवाद साधत नाहीत. त्यातून त्यांचे मानसिक खच्चीकरण तर होतेच शिवाय त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचाही फुटत नाही.
म्हणूनच राज्य महिला आयोगाने अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे. 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून आयोगातर्फे सुहिता नावाची नवी हेल्पलाईन समुपदेशनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सुहिता या हेल्पलाईन विषयी बोलताना विजया रहाटकर यांनी सांगितले की, या हेल्पलाईनसाठी 7477722424 हा फोन नंबर उपलब्ध करून देण्यात आला असून कार्यालयीन कामकाजाच्या वेळात ही हेल्पलाईन सुरू राहणार आहे. ही हेल्पलाईन मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून उपलब्ध असल्याने त्याचा फायदा शहरी तसेच ग्रामीण महिलांनाही होणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून समोरच्या महिलेचे म्हणणे ऐकुन त्यांवर तीचे समुदपदेशन करण्यात येईल तसेच तक्रारीचे स्वरूप जाणून घेऊन संबंधित जिल्ह्यातील संबंधित विभागाला या हेल्पलाईन मार्फत ई मेल करून तातडीने माहिती देण्यात येईल. तसेच या तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेऊन आवश्यकता असल्यास आयोगामध्ये सुनावणीसाठीही बोलावण्यात येणार आहे. अशी तीन महत्वाची कामे या हेल्पलाईनच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
या हेल्पलाईनवर ज्या महिलेने तक्रार केली आहे तिला तीच्या मोबाईलवर तिकिट नंबर मेसेज केला जाईल जेणेकरून त्याबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल. त्यामुळे ही हेल्पलाईन ख-या अर्थाने महिलांसाठी एक मैत्रिणच ठरेल असा विश्वास विजया रहाटकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे.
महिला दिनाचे औचित्यसाधून 8 मार्च रोजी आयोगाच्या वांद्रे येथील कार्यालयात एका विशेष कार्यक्रमात या हेल्पलाईनचे लोकार्पण होणार असून याचवेळी “प्रवास सक्षमतेकडे” व “साद दे...साथ घे” या दोन पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिंलाचे समुपदेशन करणा-यांसाठी प्रवास सक्षमतेकडे हे मार्गदर्शक पुस्तक तयार करण्यात आले आहे. तर आयोगाने सोडविलेल्या 25 यशस्वी प्रकारणांचे साद दे.. साथ घे.. या पुस्तक तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य महिला आयोगाकडे दररोज प्रत्यक्ष, पत्र आणि ई मेल व्दारे 100 ते 120 तक्रारी येतात. राज्यभरातून महिलांना न्यायासाठी आयोग कार्यालयात यावे लागते. मात्र या नव्या हेल्पलाईनमुळे ही न्याय प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असा विश्वास विजय रहाटकर यांनी व्यक्त केला आहे.