Mahaparinirvan Din 2023: मुंबईतील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना उद्या म्हणजेच 6 डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ही सुट्टी जाहीर केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही सुट्टी देण्यात आली असल्याचं शासकीय परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. हा आदेश मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शासनाने सुट्टीसंबंधी काढलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे की, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी 'अनंत चतुदर्शी'च्या दिवशी आणि 2007 पासून गोपाळकाला (दहीहंडी) निमित्तान मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता 2023 मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना तिसरी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. 


6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असून यानिमित्ताने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच हा आदेश मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू असणार आहे. 


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रचंड भीमसागरासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सुट्टीची मागणी केली होती. 6 डिसेंबर या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करा, अशी मागणी करणारं पत्र वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. 


बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी आणि गरीब, दलित व मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, आता या दिवशी सर्व कार्यालये बंद राहणार असून अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होणार आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.