मुंबई : मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.


रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता.महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) इथं त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसंच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले आहेत. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.



रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून अशा प्रकारे डोंगर उतारांवरील गावे आणि वस्त्या इथल्या रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पुढील 2 ते 3 दिवस हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरिक यांनी दक्षता घ्यावी तसेच यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. पूरग्रस्त नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावं आणि अडकलेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटे, कपडे, औषधी त्वरित मिळतील हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.