सावधान! कोरोनाच्या उपचारासाठी विकल्या जात आहेत बोगस गोळ्या
सौ ग्राम का देडसौ....
अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव सर्वांच्या नाकीनऊ आणत आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत करणाऱ्या आणि झपाट्याने फोफावणाऱ्या या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जात आहेत. पण, त्यात चुकीच्या मार्गाने कोरोनावरील औषधांचीही विक्री करण्याचा काळाबाजार सुरु झाला आहे.
मुलुंडमधील शीतल आयुर्वेदिक भंडार चक्क कोरोनाच्या नावाखाली औषधांचा गोरखधंदा सुरु आहे. 'झी २४ तास'नं केलेल्या एका स्टींग ऑपरेशनमध्ये या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाला आहे. अवघे कादी दिवस दोन वेळा गरम पाण्यातून गोळ्या घ्या आणि कोरोना बरा करा.... असं जाहीरपणे सांगत या औषधांची विक्री सुरु होती.
दहा- दहा मिनिटांनी ही औषधं खाल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे कोरोना व्हायरसची लागणही रोखता येते असं सांगत संबंधित विक्रेत्याने या औषधांची विक्री केली.
कोरोना बरा करण्याच्या नावाखाली विकण्यात आलेली ही औषधं विकण्यात आली खरी. पण, त्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारची तारीख, उत्पागकांची माहिती वगैरे नमूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अखेर 'झी २४ तास'च्या पुढाकाराने याप्रकरणी थेट पोलीसांत धाव घेण्यात आली. ज्यानंतर लगेचच पोलीस आणि एफडीएची चक्र फिरली आणि या बोगस औषधं विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. सौ ग्राम का देडसौ.... असं म्हणत नागरिकांच्या जीवाशी सुरु असणारा हा खेळ एका ठिकाणी थांबला. दुकानाचे मालक नितेश पांड्या याच्यावर गुन्हा दाखल केला गेला. असं असलं तरीही नागरिकांनीही अशा फसव्या जाहिरातबाजीला भुलणं धोक्याचं आहे.
#Corona : क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे काय?
लोकहो कोरोनावर अशा कुठल्याही आयुर्वेदिक गोळ्या मिळत नाहीत... अशा फसवणूक करणाऱ्यांवर मुळीच विश्वास ठेवू नका. कोरोनाला रोखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. काळजी घ्या.... सजग राहा आणि असले गोरखधंदे करणारे कुणी सापडले, तर नक्की तक्रार करा.