नवी मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांवर होणाऱ्या दगडफेकीचा महारोग आता हार्बर रेल्वे मार्गावरही पोहोचला आहे. बेलापूर-सीएसटी लोकलवर वाशी - मानखुर्द स्थानकादरम्यान अज्ञाताने दगडफेक केली. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अज्ञातांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी खाडी पुलावर दगड फेकल्यामुळे लोकलमध्ये ड्युटीवर असलेला एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. बेलापूर-सीएसएमटी लोकलवर ही दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला आहे. मध्य रेल्वे मार्गावर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेक जण जखमी झाले आहेत. आता या घटना हार्बर मार्गावरही होत असल्यानं समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. 


गेल्या काही आठवड्यात सातत्याने मध्य रेल्वे मुख्य मार्गावर दगडफेकीच्या घटना घडत आहेत. मध्य रेल्वे आणि आरपीएफने मुख्य मार्गावर ट्रँकमध्ये सीसीटीव्ही लावण्यासोबतच गस्तही वाढवली आहे. मात्र आता हार्बर मार्गावरील दगडफेक घटनेमुळे रेल्वे प्रवासी सुरक्षेचे आव्हान कायम आहे.