TISS BBC Documentary On Modi: इशाऱ्यानंतरही विद्यार्थ्यांनी Laptop वर पाहिली मोदींवरील वादग्रस्त डॉक्युमेंट्री
Mumbai TISS Documentary On PM Modi Screening: यासंदर्भात संस्थेनं विद्यार्थ्यांना इशारा देणारं सूचना पत्रक जारी केलं होतं ज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला होता.
Screening of BBC Modi Documentary At TISS: टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) प्रशासनाने इशारा दिल्यानंतरही मुंबईमधील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) आधारित 'बीबीसी'च्या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीचं (BBC Modi Documentary) स्क्रीनिंग केलं आहे. विद्यार्थ्यांच्या एका गटाने बीबीसीची वादग्रस्त डॉक्युमेंट्री दाखवण्यासंदर्भातील नियोजन केल्याची बातमी समोर आल्यानंतर मुंबईमधील (Mumbai) 'टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'च्या (Tata Institute of Social Sciences) प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी एक सूचना पत्रक जारी केलं होतं. संस्थेच्या कॅम्पसमध्ये अशाप्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करु नये असा इशारा प्रशासनाने दिला होता. या सूचनेकडे दुर्लक्ष करुन कार्यक्रमाचं आयोजन केल्यास नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल असं या पत्रकात म्हटलं होतं. असं असतानाही 200 विद्यार्थ्यांनी एकत्र बसून लॅपटॉपवर (Laptop) ही डॉक्युमेंट्री पाहिली.
परिणांचा उल्लेख करुन संस्थेकडून इशारा
"आमच्या असं लक्षात आलं आहे की काही विद्यार्थी, सरकारने निर्बंध घातलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगसंदर्भात सल्ल्याचं उल्लंघन करणाऱ्या हलचाली करत आहेत. हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना एकत्र आणत आहेत, असं निदर्शनास आलं आहे," असा उल्लेख या पत्रकात आहे. "अशाप्रकारच्या कोणत्याही स्क्रीनिंगला परवानगी देण्यात आलेली नाही ज्यामुळे संस्थेमधील वातावरणावर परिणाम होईल," असंही या पत्रकात म्हटलं आहे.
भाजपाचं आंदोलन
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संस्था असलेल्या भारतीय विद्यार्थी परिषदेबरोबरच (एबीव्हीपीने) भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने (बीजेव्हायएमने) या स्क्रीनिंगच्या विरोधात संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केलं. भाजपाच्या मुंबई विभागाचे प्रमुख आशीष शेलार यांनी ट्वीटरवरुन, "पोलिसांनी तातडीने यावर बंदी घालायला हवी होती. नाहीतर आम्ही योग्य ती भूमिका घेऊ" असा इशारा दिला. या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंग होणार नाही असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर भाजपाने हे आंदोलन मागे घेतलं.
लॅपटॉपवर पाहिली डॉक्युमेंट्री
मात्र भाजपा आणि भाजपाशी संबंधित संस्थांच्या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ केलेल्या आंदोलनानंतर मोठ्या स्क्रीनवर स्क्रीनिंग करण्यात आलं नाही. मात्र असं असलं तरी नियोजित ठिकाणी जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी खुर्चांवर लॅपटॉप ठेऊन एकत्र गटागटाने ही डॉक्युमेंट्री पहिली.
दिवसोंदिवस वाढतोय वाद
पंतप्रधान मोदींसंदर्भातील डॉक्युमेंट्रीवरुन सुरु असलेला वाद दिवसोंदिवस वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये या डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग थांबवण्यासाठी संस्थेमधील वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा खंडित केली होती. शुक्रवारी देशाच्या राजधानीमधील दोन विद्यापीठांमध्येही अशाप्रकारची पावलं या डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग रोखण्यासाठी उचलण्यात आली. यामध्ये दिल्ली विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठाचा समावेश आहे.
अनेक ठिकाणी यावरुन झालाय वाद
दिल्ली विद्यापीठामधील कला शाखेमध्ये डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगची योजना आखण्यात आली होती. मात्र बाहेरच्या विद्यार्थ्यांनी यासाठी येऊन नये असं सांगण्यात आलेलं. एका अन्य ठिकाणी म्हणजेच आंबेडकर विद्यापीठामध्येही प्रशासनाने स्क्रीनिंगवर निर्बंध घालण्यासाठी वीजपुरवठा खंडित केला होता. दोन्ही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाने याविरोधात घोषणाबाजी तसेच आंदोलन केलं. यापैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली आणि आंबेडकर विद्यापीठाआधी बीबीसीची ही डॉक्युमेंट्री जेएनयू आणि जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठामध्येही दाखवण्याची योजना होती. मात्र या दोन्ही विद्यापीठांमध्येही ही डॉक्युमेंट्री दाखवण्यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली होती.