धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी, २० वर्षीय तरूणाचा मृत्यू
धावत्या लोकलमधून स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
मुंबई : धावत्या लोकलमधून स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी केल्यामुळे अनेक तरूणांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. अशीच एक घटना मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा दरम्यान घडली आहे. या स्टंटबाजी मुळे कल्याणच्या २० वर्षीय तरूणाने आपले प्राण गमावले आहे.
कल्याणमधील एका २० वर्षीय तरूणाचा धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव दिलशाद नौशाद खान असे आहे. दिवा मुंब्रा दरम्यान हा अपघात झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
दिलशाद आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी गोवंडीला कपडे विकत घ्यायला गेला होता. घरी परतताना लोकल रिकाम्या होत्या. त्यामुळे तो धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करू लागला. शिवाय त्याच्यासोबत असलेला मित्र त्याचा व्हिडिओ बनवत होता.
स्टंट करताना दिलशाद दिवा-मुंब्रा दरम्यान एका खांबाला धडकला आणि खाली कोसळला. त्यानंतर त्याला तात्कळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिथेच दिलशादला मृत घोषित केले.