मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेआधीच शिवसेनेत मंत्रिपदावरून खलबतं सुरू झाली आहे. बार्गेनिंग पॉवर वाढल्यामुळे क्रीम मंत्रिपदं मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गृहमंत्रालय, शहरविकास, सार्वजनिकसह बांधकाम खात्यासारखी मंत्रीपदं हवी आहेत. मात्र भाजप ही मुख्य मंत्रिपदं देण्यास तयार नाही. सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे असल्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला भाजपकडून कृषीमंत्री पद देण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत साशंकता आहे. आदित्य ठाकरेंचा मंत्रिमंडळात प्रवेश झालाच तर त्यांच्याकडे शिक्षणखातं दिलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पण शिवसैनिकांकडून आणि आमदारांकडून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरते आहे. तर उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून सुभाष देसाईंचं नाव चर्चेत आहे. शिवसेनेकडून मंत्रिमंडळातून रामदास कदम आणि दिवाकर रावते यांना वगळलं जाऊ शकतं. 


राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना-भाजपकडून हालचाली सुरु आहेत. निवडणुकीत एकत्र लढले असले तरी आता मात्र दोन्ही पक्षाचे नेते उघडपणे एकत्र येत नाही आहेत. शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने शिवसेनेचा भाव नक्कीच वाढला आहे. पण भाजप शिवसेनेच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपचे नेते स्वतंत्रपणे राज्यपालांच्या भेटीला गेल होते. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सत्तास्थापनेच्या हालचाली करत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे शिवसेनेने सत्तेचा समसमान वाटपाचा आग्रह धरला आहे.