दीपक भातुसे, मुंबई : केसरी शिधापत्रिका धारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. दारिद्र्य रेषेवरील केसरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ रुपये किलो गहू आणि २ रुपये किलो तांदूळ या दरानं धान्य देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात केसरी कार्डधारकांना हे धान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी २५० कोटी रुपये खर्च येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात ३ कोटी ८ लाख केसरी कार्डधारक आणि ५० लाख सफेद कार्डधारक आहेत. सफेद कार्डधारकांनाही धान्य पुरवण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.


तालुक्याच्या ठिकाणी ५ रुपयांत शिवभोजन थाळी


तसेच शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर राबवण्यात येणार असून पुढील तीन महिने ५ रुपये दरानं भोजन देण्यात येणार आहे.


लॉकडाऊन वाढवण्याबाबत सध्या कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे.


कोरोना लॉकडाऊनमुळे मजूर, स्थलांतरित, बेघर आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचे जेवणाअभावी हाल होऊ नयेत म्हणून तालुकास्तरावर पुढचे तीन महिने शिवभोजन थाळी ५ रुपयांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ही केंद्रे सुरु ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीनं उपाययोजना, अधिसूचना आणि आदेश काढण्यात आले. उपाययोजनांसाठी उच्चस्तरिय समिती स्थापन करण्यात आली आहे.


 



कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली.


निजामुद्दीनवरून आलेल्या लोकांनी समोर यावं, कुणी लपण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिला.