संजय राऊत यांच्या आरोपावर सुधीर मुनगंटीवार यांनी काय उत्तर दिलं पाहा
जो शिवसैनिक आहे तो भित्रा कधीच असू शकत नाही. तो ईडीच नाही ईडीचे आजोबा आले तरी घाबरणार नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाचा.
मुंबई : एक सत्तारुढ पक्षाचा नेता, तुम्ही तोंड बंद करा नाही तर संपवू अशी भाषा करत असेल, तर निश्चितपणे याची नोंद होईल, संजय राऊतांनी भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही जोरदार टीका केलीय. त्यांच्या मुलीच्या लग्नात जंगलाचा फील यावा म्हणून 9 कोटींचं कारपेट टाकण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनीही उत्तर दिलंय.
लग्न सोहळ्याच्या सर्व पावत्या आपण त्याचवेळी दाखवल्या. आता संजय राऊतांकडे बोलण्यासारखं काहीच नसल्यानं ते बेछूट आरोप करतायेत असं उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मनापासून लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येक निर्णय करतायत, राष्ट्रपती राजवट मोदीजी कधीच लावणार नाहीत, सुप्रीम कोर्टा मात्र एका पद्धतीने आदेश देऊ शकेल कारण ज्या पद्धतीने आपल्या राज्यात संविधानाचा ९८ वेळा भंग झाला आहे, संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन देशात कधी घडत नाही, अशा घटना आपण बघितल्या आहेत.
मंत्रीमंडळाच्या बैठकीतसुद्धा नियमांच्या बाहेर जाऊन निर्णय होतात, हे पहिल्यांदा होतंय, महाराष्ट्राचं सरकार जनतेने निवडून दिलं, महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीला १६१ आमदार दिले, पण लोकशाहीचा विश्वासघात झाला, जनादेशाचा अवमान झाला, आणि हे सागतायत की लोकांनी आम्हाला निवडून दिलं.
लोकांनी यांना निवडणून दिलेलं नाही. दुसऱ्याच्या मार्कशिटवर त्याचा नंबर काढायचा आणि स्वत:चा नंबर टाकायचा आणि परिश्रम न करता मी पास झालो, हा आव यांनी आणलाय.
शिवसेनेचे फक्त ५६ आमदार निवडून आले आहेत. ५६ आमदार आणि तेही भाजपसोबत, आणि आता ते सांगतायत की आम्ही असं करु तसं करु, भारतात भाजपचं सरकार आहे, वीस राज्यात काँग्रेसचा एक खासदार निवडून आलेला नाही, १७ राज्यात भाजपाला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान आहे.
हे सांगतायत, राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी दबाव टाकला जातो, म्हणून असं वाटतं की हे स्वत:ला भेकड म्हणवून घेतायत का. जो शिवसैनिक आहे तो भित्रा कधीच असू शकत नाही. तो ईडीच नाही ईडीचे आजोबा आले तरी घाबरणार नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाचा.