महापालिकांच्या उत्पन्नाचा केंद्र सरकारच्या धोरणांशी संबंध नाही- मुनगंटीवार
अनैतिक सरकारला विकास साधता येत नसल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
मुंबई : राज्यातील महापालिकांच्या उत्पन्नाचा केंद्र सरकारच्या धोरणांशी दुरान्वयानेही संबंध नाही. ही स्थिती 'नाचता येईना अंगण वाकडे' अशी असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांवर केली आहे. केंद्र सकराच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील महानगरपालिका डबघाईस आल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना अनैतिक सरकारला विकास साधता येत नसल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली होती. राज्यातील महापालिकेचं उत्पन्न घटलं याला केंद्र सरकारची धोरणं आणि आर्थिक संकट कारणीभूत असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं होतं. पुण्यात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
#UnionBudget2020 'हलवा सेरेमनी'नंतर अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात
केंद्रामुळे पालिकेचा अर्थसंकल्प मोडकळीस येत असल्यामुळे केंद्राच्या अर्थ संकल्पावर राज्य सरकार विशेष लक्ष ठेवणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले. केंद्राचा अर्थसंकल्प आल्यानंतरच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर्षी १ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभुमीवर त्यांनी हे विधान केले.
दरम्यान, राज्यातील ४५० आयटीआयचा कायापालट करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत २५० आयटीआयच्या सुधारणेसाठी टाटा कन्सलटन्सी १० हजार कोटी रुपये देणार आहे. तसंच कोकणातील सात जिल्ह्यांच्या विकासासाठी निधी देण्यासंदर्भात चर्चा झाली असून जिल्हा विकासासाठी निधी देताना मानवविकास निर्देशांक, लोकसंख्या क्षेत्रफळ, शहर आणि ग्रामीण याबाबी लक्षात घेतल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.