मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. डॉ. सुजय विखे-पाटील हे न्यूरोसर्जन आहेत. अहमदनगर मतदारसंघातून त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांचं नाव दिल्लीला भाजपच्या संसदीय बोर्डाकडे पाठवलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अहमदनगर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी तयार नव्हती. त्यामुळे अखेर त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडे आग्रह देखील केला होता की, राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा त्यांच्या मुलासाठी सोडावी. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळली. सध्या दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं की, 'राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुजय यांचं मन वळवलं पाहिजे. काँग्रेस पक्ष त्यांच्या मागणीचा विचार करते आहे.'


याआधी सुजय यांनी जाहीर केलं होतं की, जर काँग्रेस पक्ष त्यांना उमेदवारी देत नाही तर ते अपक्ष निवडणूक लढवतील. पण मंगळवारी त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. 


महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक ४ टप्प्यांमध्ये होणार आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागांच्या बाबतीत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.