मुंबई : मोठा गाजावाजा करत मुंबई महानगरपालिकेनं भांडूप इथं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं घोषित केलं. त्यासाठी दीडशे कोटींची तरतूदही केली. मात्र आता एका बिल्डरच्या फायद्यासाठी नियोजित हॉस्पिटलचा गळा पालिका प्रशासनानं घोटल्याचा आरोप होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्व मुंबईत पालिकेचं एकही मोठे रुग्णालय नसल्यानं, भांडूप इथे सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं मुंबई महानगरपालिकेनं ठरवलं. त्यासाठी रुणवाल बिल्डरकडून टीडीआरच्या बदल्यात १८ हजार ७६५ चौरस मीटरचा भूखंडही महानगरपालिकेनं ताब्यात घेतला. मात्र गेल्या ५ - ६ वर्षांत महानगरपालिकेनं तिथं काहीच काम केलं नाही. 


दरम्यानच्या काळात रुणवाल बिल्डरने उच्च न्यायालयात जाऊन पालिकेच्या ताब्यातील ८ हजार चौरस मीटरचा भूखंड परत मिळविण्याच्या हालचाली सुरु केल्या आणि त्यांना यात यशही मिळालं. या ८ हजार चौरस मीटर जागेची बाजारभावानुसार किंमत सुमारे ५०० कोटी इतकी आहे. 


या मुद्द्यावरुन आता चांगलंच राजकारण रंगलं आहे. पालिकेच्या सुधार समितीत या विषयावरून शिवसेना भाजप आमनेसामने आली आहे. एवढ्या मोठ्या भूखंडासाठी पालिका प्रशासन बिल्डर विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी, नमत घेत भूखंड द्यायला का उतावीळ झाली आहे असा प्रश्न उपस्थित होतो.