मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. मात्र, येत्या १० दिवसात नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहून रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असं सुप्रीम कोर्टानं आदेशात म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंवर आरोप करण्यात आले असून याआधी जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते. आज सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. 


जिल्हा सत्र न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी फेटाळला आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला आणि तो पुन्हा फेटाळण्यात आला तर राणे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. हा राणे यांना एकप्रकारे न्यायालयाने झटका दिल्याचं मानलं जात आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी फक्त तीन शब्दांचे ट्विट करून नितेश राणे यांना शाब्दिक मालवणी फटका दिलाय. नार्वेकर यांच्या या ट्विटची सोशल माध्यमांवर चर्चा होत आहे. या ट्विटमध्ये नार्वेकर यांनी "लघु सुक्ष्म दिलासा!" इतकंच म्हणत राणे यांना डिवचलं आहे.