मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या तोंडावर नॉट रिचेबल झालेले अजित पवार संपर्कात आले आहेत. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात फोनवरुन चर्चा झाली आहे. अजित पवार संध्याकाळी साडेपाच वाजता सिल्व्हर ओकवर येणार आहेत. तिकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात यावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून दबाव वाढत आहे. त्यामुळे अजित पवारच उपमुख्यमंत्री होतील, पण याबाबतचा निर्णय आज दुपारी २ वाजता किंवा नंतर घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांना द्यावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे अनेक समर्थक त्यांच्या घरी आणि धनंजय मुंडे यांच्या घरी जमले आहेत. अजित पवार धनंजय मुंडे यांच्या घरी येणार असल्याची चर्चा असल्याने तिथेही समर्थकांची गर्दी केली होती.


राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देऊन खळबळ माजवून दिली. अजित पवारांनी पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण अजित पवारांचं हे बंड ३ दिवसांमध्येच थंड झालं आणि अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.