नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप प्रवेशाचे वेध लागलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली. त्या शनिवारी नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे जगजितसिंह राणा यांच्यावर निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आजकाल वंशाचे दिवे वडिलांचे काय होते यापेक्षा स्व:तचा विचार करतात. आपल्या करियरसाठी ते त्यांना ढकलून द्यायलाही तयार होतात. अशा वंशांच्या दिव्यांपेक्षा मुली बऱ्या असतात. त्या बापाला कुणापुढे झुकायला तरी लावत नाहीत. कुठल्याही वडिलांना असा दिवस बघायची वेळ येऊ नये. ज्या वडिलांचे उभे आयुष्य ताठ मानेने जगण्यात गेले, आज त्यांची अवस्था पाहा. मात्र, त्यांची घालमेल मुलाला कळत नाही. ठेकेदरीसाठी मुलाने वडिलांना दुसऱ्या पक्षात जायला भाग पाडले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. 


जगजितसिंह राणा पाटील हे पद्मसिंह पाटील यांचे पूत्र आहे. पद्मसिंह पाटील हे पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे पाटील घराण्याचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. 


तत्पूर्वी शुक्रवारी श्रीरामपूर येथे झालेल्या एका पत्रकारपरिषेदत शरद पवार यांना एका पत्रकाराने विचारणाही केली होती. राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून चालले आहेत. त्यात तुमचे नातेवाईक पद्मसिंह पाटील यांचाही समावेश आहे, असा प्रश्न त्याने विचारला. त्यावर शरद पवार यांचा पारा भलताच चढला. 


तुम्ही माफी मागा. अन्यथा चालते व्हा, असे त्यांनी त्या पत्रकाराला सुनावले. ते स्वत:ही निघून जाण्याच्या तयारीत ते होते. मात्र नंतर राष्ट्रवादीचे अविनाश आदिक व ज्येष्ठ पत्रकारांच्या मध्यस्थीनंतर त्यावर पडदा पडला.


सुप्रिया सुळे यांनी आजच्या भाषणात त्याचाही उल्लेख केला. कधी न चिडलेल्या माणसाला मी पहिल्यांदा चिडताना पाहिले. त्याला कारणही तसेच होते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.