८ जून ते १४ जून, नेमकं काय घडलं? सिद्धार्थ सांगतोय... सुशांतच्या मृत्यूची कहाणी
आठवड्याभरात सुशांतच्या आयुष्यात काय घडलं, याची माहिती सिद्धार्थने सीबीआयला दिली आहे.
मुंबई : सुशांतसिंह राजपूतने १४ जूनला आत्महत्या केली, पण ८ जूनपासूनच तो मानसिकदृष्ट्या कमजोर झाला होता, अशी माहिती त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याने सीबीआयला दिल्याचं समजतंय. या आठवड्याभरात सुशांतच्या आयुष्यात काय घडलं, याची माहिती सिद्धार्थने सीबीआयला दिली आहे.
रिया चक्रवर्तीने हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट केल्याचा खळबळजनक आरोप सिद्धार्थ पिठानीने सीबीआयला दिलेल्या जबाबात केला आहे. सुशांतचं घर सोडण्याआधी रियाने सगळा डेटा डिलीट केला आणि त्यानंतरच ती बाहेर पडली, असा गौप्यस्फोट सिद्धार्थने केला. ८ जून ते १४ जून या आठवडा भराच्या काळात सुशांतच्या घरात काय घडलं? याची कहाणीच सिद्धार्थने सीबीआयला सांगितली आहे.
९ जून २०२० ला दिशा सालियानच्या आत्महत्येची बातमी समजताच सुशांत बेचैन झाला. सुशांतने त्या रात्री सिद्धार्थला आपल्या बेडरुममध्ये झोपायला सांगितलं. दिशाच्या मृत्यूबाबात त्याने सिद्धार्थकडे माहिती मागितली. दिशाच्या मृत्यूमुळे सुशांत घाबरला होता, असं सिद्धार्थच्या जबाबावरुन जाणवतंय.
१० जून २०२० ला सुशांत खूपच बेचैन झाला आणि बहिणीला फोन करुन तो रडत होता.
११ जून २०२० ला सुशांतने सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहावं, असं सुशांतची बहिण मितूने सांगितलं. पण तरीही सुशांत उदासच होता.
१२ जून २०२० ला आपल्या मुलीची आठवण येऊ लागली आणि पुन्हा ती आपल्या गोरेगावच्या घरी निघून गेली.
१३ जून २०२० ला एक बिल भरायला सिद्धार्थने सुशांतची मदत केली. त्या रात्री १० वाजता कूक नीरज सिंगने सुशांतला ज्युस दिलं. काहीही न खाता केवळ ज्युस पिऊन सुशांत झोपला.
१४ जून २०२० ला सिद्धार्थच्या सांगण्यानुसार सकाळी १० ते १०.३०च्या दरम्यान सिद्धार्थ हॉलमध्ये आला. १०.३०च्या आसपास केशवने सिद्धार्थला सुशांत दरवाजा उघडत नसल्याचं सांगितलं. ही गोष्ट त्याने दीपेश सावंतला सांगितली. दोघांनी जाऊन दरवाजा वाजवला, पण सुशांतने दरवाजा उघडला नाही. तेवढ्यात सुशांतची बहिण मितूचा फोन आला. सुशांत फोन उचलत नाही, असं ती सांगत होती. तेव्हा तो दरवाजा देखील उघडत नसल्याचं सिद्धार्थने सांगितलं.
सिद्धार्थने मितूला घरी बोलावलं आणि चावी वाल्याला बोलवण्यासाठी दीपेशला वॉचमनकडे पाठवलं. वॉचमनने मदत केली नाही, तेव्हा सिद्धार्थने गुगलवरुन रफीक चावीवाल्याचा नंबर शोधून काढला. दुपारी १ वाजून ६ मिनिटांनी त्याला फोन करण्यात आला. लॉकचा फोटो आणि घराचा पत्ता व्हॉट्सऍपवर पाठवण्यात आला. चावी वाल्याला बोलावल्याची माहिती सिद्धार्थने मितूला दिली.
दुपारी १ वाजून २० मिनिटांनी रफीक आपल्या एका साथीदारासह तिथे आला. लॉकची चावी बनवता येणार नाही, असं त्याने सांगितलं. तेव्हा सिद्धार्थने त्याला लॉक तोडायला सांगितलं. काही मिनिटांमध्येच रफीकने लॉक तोडंलं. सिद्धार्थने त्याला २ हजार रुपये देऊन परत पाठवलं.
सिद्धार्थ आणि दीपेश सुशांतच्या रुममध्ये पोहोचले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. सुशांत हिरव्या रंगाच्या कपड्यासह पंख्याला लटकत होता. सुशांतचे पाय बेडच्या बाजूला होते. सिद्धार्थने मितूला आणि १०८ नंबरवर कॉल करून घटनेची माहिती दिली. तेवढ्यात सुशांतची चंडीगडची बहिण नीतूचा कॉल आला. सिद्धार्थने तिला काय घडलं हे सांगताच तिने फोन कट केला. पुन्हा फोन करून तिने आणि तिचे पती ओपी सिंह यांनी सुशांतला पंख्यावरुन खाली उतरवायला सांगितलं.
नीरज चाकू घेऊन आला. त्याने सुशांतच्या गळ्याभोवती आवळलेला कपडा फाडला आणि सुशांतची बॉडी बेडवर ठेवली. मितू घरी पोहोचली, तेव्हा तिने आल्या आल्या पहिला प्रश्न सुशांत जिवंत आहे का? हाच प्रश्न विचारला. मात्र सुशांतचा केव्हाच मृत्यू झाला होता.
सिद्धार्थ पिठानीने सांगितलेला हा घटनाक्रम किती खरा आणि किती खोटा? याची चौकशी सीबीआय करत आहे. रिया चक्रवर्ती, नीरज सिंग, दीपेश सावंत यांनी दिलेल्या जबाबांशी ही माहिती कितपत जुळते याचा तपास सीबीआय करतंय. सुशांतचा मृत्यू नेमका कसा झाला? याचं रहस्य तपासात उघड होईल, अशी अपेक्षा आहे.