मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर पार्थ पवार पुन्हा चर्चेत आले. हे प्रकरण सीबीआयकडे सोपावण्याची मागणी सगळ्यात आधी पार्थ पवार यांनीच केली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या नव्या ट्विटने पार्थ पुरणात नवा अध्याय जोडला गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर, 'सत्यमेव जयते', असं एका ओळीचं ट्विट पार्थ पवार यांनी केलं. याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारं पत्र पार्थ पवार यांनीच सगळ्यात आधी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. याच मागणीवरुन शरद पवार यांनी जाहीरपणे आपल्या नातवाचे कान उपटले होते.



माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहेत, असं शरद पवार म्हणाले होते. पण याच इमॅच्युअर नातवाची मागणी सुप्रीम कोर्टाने उचलून धरली, त्यामुळे सत्यमेव जयते, असं ट्विट पार्थ पवार यांनी केल्यानंतर चर्चा तर होणारच. 


पहिल्या तीन तासातच पार्थ पवार यांच्या ट्विटला ४० हजारांहून अधिक नेटिझन्सनी लाईक केलं. पार्थ यांच्या या ट्विटचे राजकीय वर्तुळातही जोरदार पडसाद उमटले. पार्थच्या ट्विटचा अर्थ कुणी कसाही लावू शकतो, अशी सावध प्रतिक्रिया चुलत बंधू रोहित पवार यांनी दिली. 


पार्थ यांच्या प्रतिक्रियेमुळे राष्ट्रवादी पक्षाला काही डॅमेज होईल, असं वाटत नसल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. यानिमित्ताने भाजपने शिवसेनेला सवाल करण्याची संधी साधली आहे. पार्थ पवारांनी सत्यमेव जयते ही भूमिका घेतली आहे. शिवसेनाही सत्यमेव जयते ही भूमिका घेणार का? हा थेट प्रश्न आम्ही विचारत असल्याचं भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत. पार्थ पवार यांनी एका ओळीत अनेक पक्षी आडवे केलेत, एवढं मात्र नक्की.