`संदीपसिंह आणि भाजप, ये रिश्ता क्या कहलाता है?`, काँग्रेसच्या सचिन सावंत यांचा निशाणा
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींचा बायोपीक बनवणाऱ्या संदीपसिंहचे नाव या प्रकरणात ड्रग संदर्भात जोडले गेले. हे पाहता संदिपसिंह, भाजप व ड्रग माफिया यांच्यातील संबंधावर प्रकाश पडत आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
१४ जूनला सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच संदीपसिंहने भाजपा च्या एका नेत्याला भेटून ब्रिफिंग दिले तो नेता कोण? याची चौकशी केल्यास ते स्पष्ट होईल, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. संदीपसिंह आणि भाजपा यांच्यातला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’?, असा सवालही सचिन सावंत यांनी विचारला आहे.
सावंत पुढे म्हणाले की, 'संदिपसिंहच्या कंपनीचा आर्थिक ताळेबंद पाहता त्याच्या कंपनीला २०१७ मध्ये ६६ लाखांचे नुकसान झाले होते, २०१८ मध्ये ६१ लाखांचा फायदा तर पुन्हा २०१९ मध्ये ४ लाखांचे नुकसान झाल्याचे दिसते. अशा तोट्यातील कंपनीबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी यांनी व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात १७७ कोटी रुपयांचा सामंजस्य करार कसा काय केला? ही कंपनी पैसे कुठून आणणार होती? मोदींच्या बायोपीकच्या बदल्यात हा करार झाला का? संदीपसिंहवर भाजपा एवढा मेहरबान का झाला ? या प्रशांची उत्तरे मिळाली पाहिजेत'.
'संदिपसिंहने भाजपाच्या कार्यालयात ते ५३ फोन कोणाला केले होते? याचीही स्पष्टता अजून होत नाही. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत,, अशा व्यक्तीची शहानिशा न करताच त्याच्या कंपनीशी करार कसा काय केला? हेही आश्चर्यकारक आहे. हे सर्व पाहता सखोल चौकशी केल्यास यातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी स्पष्ट होतील', असं वक्तव्य सावंत यांनी केलं आहे.