`सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव`, भाजपचा गंभीर आरोप
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे
मुंबई : सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे. सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणाच्या तपासात एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भाजपचे आमदार आणि प्रवक्ते अतुल भातकळकर यांनी केला आहे. तसंच सीबीआयने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे, असंही भातकळकर म्हणाले आहेत.
याबाबत अतुल भातकळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिलं आहे. तसंच माझा रोख कुणाकडे आहे, हे उघड गुपित असल्याचंही भातकळकर म्हणाले आहेत.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात यावा, अशी भावना मोठ्याप्रमाणावर सामान्यांमध्ये आहे. परंतु, राज्य सरकार त्यासाठी तयार नाही. राज्य सरकारची ही आडमुठी भूमिका पाहता किमान सक्तवसुली संचलनालयाला ED याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी. कारण या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणीखोरीचा पैलू समोर आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही या प्रकरणाच्या तपासावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. बिहार पोलिसांच्या तपासामध्ये मुंबई पोलीस अडथळे आणत आहेत. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे ही केस सीबीआयला देण्यात यावी, अशी मागणी सुशील मोदींनी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर या सगळ्या वादात बिहार पोलिसांची एन्ट्री झाली आहे.
सुशांतसिंग प्रकरणाची चौकशी सीबीआयला द्यावी, अशी मागणी फक्त भाजपच नाही तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी केली होती. यासाठी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेटही घेतली. पण मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत असल्याचं सांगत गृहमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली.