`मालेगाव बॉम्बस्फोटच्या तपासात कोणाचा दबाव?`
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारच्या काळात पोलिसांवर कुणाचा दबाव होता
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेस सरकारच्या काळात पोलिसांवर कुणाचा दबाव होता, हे सत्यपाल सिंग यांनी जाहीर करावं, असं आव्हान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलंय. झी २४ तासवरील रोखठोक कार्यक्रमात ते बोलत होते.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासामध्ये राजकीय दबाव असल्याचा आरोप माजी पोलीस अधिकारी आणि आता भाजपचे खासदार असलेले सत्यपाल सिंग यांनी केला होता. सत्यपाल सिंग यांच्या या आरोपांवर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामिन मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका झाली आहे. कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून संरक्षण खात्याच्या सेवेत पुन्हा रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जामिन मिळाल्यानंतर संरक्षण खात्याच्या व्याख्येनुसार ओपन अरेस्टमध्ये असलेला कर्नल प्रसाद पुरोहितची संरक्षण खात्यातली औपचारिकता आज पूर्ण झाली आहे. त्यामुळे उद्यापासून संरक्षण खात्याचा गणवेश घालून पुरोहित पुन्हा सेवेत दाखल होणार असल्याची माहिती संरक्षण खात्याच्या एका अधिका-याने नाव न घेण्याच्या अटीवर दिलीये.
मालेगाव स्फोटातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामीन मंजूर झाल्यावर त्यांची आज तळोजा तुरुंगातून सुटका झाली. पुरोहितच्या सुटकेच्यावेळी त्यांचे कुटुंबिय सुद्धा तळोजा तुरुंगात उपस्थित होते.