मुंबई : नालासोपारा परिसरात एका नायझेरियन युवकाचा संशयित मूत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर नायझेरियन नागरिकांनी परिसरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करत येथील काही नागरिकांना मारहाण केली आहे. या मारहाणीत काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तुळींज पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपारा पूर्व प्रगती नगर येथे मोठ्या प्रमाणात नायझेरियन नागरिकांची वस्ती आहे. या वस्तीत मंगळवारी रात्री दोन वाजल्याच्या सुमारास एक नायझेरियन युवक गणेश शाळेच्या जवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला शेजारी राहणाऱ्या नायझेरियन नागरिकांनी महापलिका रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात म़त्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छदनासाठी पाठवला. याच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.


या प्रकारणानंतर संतप्त नायझेरियन नागरिकांनी परिसरात राडा केला. या नागरिकांनी लाठ्या-काठ्या हातात घेत परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. त्यात काही स्थनिक नागरिक त्यांना रोखण्यासाठी गेले असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. यात दहा ते पंधरा स्थानिक नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पावलेल्या नायझेरियन नागरिकाची खरी ओळख पटलेली नाही. केवळ त्याचे नाव जोसेफ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या युवकाच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ज्या नागरिकांनी रात्री वाहनांची तोडफोड केली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान, नालासोपारा परिसरात राहत असणारे अनेक नायझेरियन नागरिक अवैधपणे राहत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. रात्रीच्यावेळी या ठिकाणी मोठ्या पार्ट्या केल्या जातात. याचा येथील नागरिकांना मनस्थाप सहन करावा लागत आहेत. याठिकाणी अमली पदार्थाचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.