‘आम्ही तुमच्या सोबत, काळजी करू नका` लोणकर कुटुंबियाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला धीर
स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागल्यामुळे भाजपने टीका केली आहे
मुंबई : ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत, काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. स्वप्नील लोणकरचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृह इथं भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वन केलं. तसंच स्वप्नीलच्या बहिणीला शक्य ती सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं. तिचं शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नीलची आई छाया, वडील सुनील तसंच बहिण पूजा यांची विचारपूस केली. घटना दुर्दैवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.
'संवेदना हरवलेलं सरकार' भाजपची टीका
दरम्यान, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागल्यामुळे भाजपने टीका केली आहे. 'अरेरे, दुर्दैवी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अखेर मुख्यमंत्र्याना भेटायला सह्याद्री अतिथीगृहात जावं लागलं. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले तसे स्वप्नीलच्या घरी जाता आले नसते का? हे तर संवेदना हरवलेले सरकार, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
का केली होती स्वप्नीलने आत्महत्या?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात 24 वर्षांच्या स्वप्नील लोणकरने गळफास घेत आत्महत्या केली होती. स्वप्नीलने अथक परिश्रम घेऊन एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली, पण दीड वर्ष उलटूनही त्याला नोकरी मिळाली नव्हती. स्वप्नील एमपीएससीच्या 2019 च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षापासून त्याची मुलाखत झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला. कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. यामुळे स्वप्निल नैराश्यात गेला. घरची बेताची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळे स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. आणि त्यातून त्याने आपलं जीवन संपण्याचा निर्णय घेतला. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं होतं. ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.