राज्यात स्वाईन फ्लूचं थैमान, गणेशोत्सवात मोठं आव्हान
स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं काढलं वर
नाशिक : दडी मारून बसलेला पाऊस, वाढता उकाडा आणि हवामानातले चढउतार यामुळे राज्यात स्वाईन फ्लू थैमान घालायला लागलाय. नाशिक मनपा क्षेत्रात सर्वाधिक स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयातल्या स्वाईन फ्लू कक्षात सोमवारी येवल्याच्या एका महिलेचा मृत्यू झाला. नाशिक मनपा हद्दीत सर्वाधिक ५४ स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळलेत.
नाशिकमध्ये थैमान
जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १६ रूग्णांचा मृत्यू झालाय. त्यातले ९ जण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातले तर ६ रूग्ण शहरातले आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक स्वाईन फ्लूचे रूग्ण सिन्नर तालुक्यात आढळले आहेत.
पिंपरीत रुग्णांची वाढ
पिंपरीमध्ये देखील स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १२६ रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूने आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं वर काढल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.
कल्याणमध्ये स्वच्छतेचे तीनतेरा
कल्याणमध्ये देखील मलेरिया, डेंग्यू, लेप्टोनंतर स्वाईन फ्लूचे संकट उभे आहे. कल्याण पूर्व परिसरात स्वाईन फ्लूचा रुग्ण सापडल्याने पालिका प्रशासन जागे झाले आहे. पालिका आयुक्तांनी यावेळी याची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
गणेशोत्सवात मोठं आव्हान
गणेशोत्सव काळात साथीचे रोग वाढू नये म्हणून पालिकेच्या बांधकाम, वैद्यकीय आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्याची समस्या दूर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
भीतीचं वातावरण
श्रीगोंदे येथील एरंडोलीमध्ये देखील 2 जणांना स्वाईन फ्लू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या अनेक ठिकाणी भीतीचं वातावरण आहे.