‘कोरोना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सोने ताब्यात घ्या!’
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
मुंबई : कोरोना संकटातून अर्थव्यवस्था आणि लोकांनाही वाचवण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज द्या अशी मागणी करणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता केंद्र सरकारला नवा उपाय सुचवला आहे. लोकांचे जीव वाचवायचे असतील तर केंद्र सरकारने हा उपाय करावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
कोरोनामुळे उद्भवलेलं आर्थिक संकट सर्वात मोठं आणि अभूतपूर्व संकट आहे. त्यातून मार्ग काढायचा असेल तर देशाच्या जीडीपीच्या कमीत कमी १० टक्के इतकं म्हणजे २०-२१ लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी १ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर चव्हाण यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण या पॅकेजबाबत अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी पूर्ण विश्लेषण केल्यानंतरच मत मांडता येईल, असंही चव्हाण यांनी सांगितलं.
पॅकेजबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, असं पॅकेज द्यावे यासाठी मी महिनाभर मागणी करत होतो. त्यामुळे या पॅकेजचे स्वागतच करायला हवे. पण अर्थमंत्री निर्मला सितारमन काय विश्लेषण करतात ते पाहावे लागेल. कारण आरबीआयने याआधी ४ ते ५ लाख कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. त्या कर्जाची मोजणी या पॅकेजमध्ये केली तर मात्र घोर निराशा होईल. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने २० लाख कोटी रुपये खर्च करायला हवेत. ते लोकांच्या खिशात गेले पाहिजेत. त्यांची क्रयशक्ति वाढली पाहिजे. कारण लोकांना रोजगार नाही, पगार नाही. त्यामुळे लोकांना वाचवायला हवे.
सोनं ताब्यात घ्या !
सरकारने पैसे कसे उभे करावेत याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी उपायही सूचवला आहे. चव्हाण म्हणाले, पैसे उभे करायचे अनेक मार्ग आहेत. देशातील सर्व धार्मिक स्ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात सोने पडून आहे. ते सरकारने व्याजावर घेतले पाहिजे. एक-दोन टक्के व्याजदरावर परतीच्या बोलीवर हे सोने ताब्यात घेऊन वापरले पाहिजे.
मंदिराकडे असलेल्या सोन्याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल या जागतिक संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात विविध धार्मिक ट्रस्टमध्ये एक ट्रिलियन डॉलर म्हणजे ७५ लाख कोटींपेक्ष जास्त किंमतीचे सोने पडून आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. कारण ही संपत्ती राष्ट्राच्या मालकीची आहे.
देशाची अर्थव्यवस्था या संकटातून बाहेर काढायची असेल तर किमान २० लाख कोटींचं पॅकेज देण्याची मागणी सर्वप्रथम पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.