मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांच्याविरुद्ध जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्टेशनला आली होती. हा जबाब नोंदवण्यासाठी तनुश्री दत्ता बुरखा घालून आली होती. तनुश्रीचं बुरखा घालून पोलीस स्टेशनला यायचं कारण अजून समोर आलेलं नाही. २००८ साली छेडछाड झाल्याचा आरोप करत तनुश्री दत्तानं काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी विनयभंग केल्याचा तनुश्रीचा आरोप आहे. चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकरनं मला ओढलं आणि तो मला डान्स शिकवत आहे, असं मी चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांना सांगितलं, पण या दोघांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप तनुश्री दत्तानं केला. माझी तक्रार न ऐकता त्यांनी नानाला तुझ्याबरोबर गाण्यात इंटिमेट स्टेप करायची आहे असं सांगितल्याचा दावा तनुश्रीनं केलाय. हे सगळं घडत असताना निर्माते, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी मौन समर्थन केल्याचं तनुश्रीचं म्हणणं आहे.


मी चित्रपट करायला नकार दिल्यानंतर नाना पाटेकरनी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवून हल्ला केल्याचा आरोपही तनुश्रीनं केला आहे. दरम्यान नाना पाटेकर यांनीही तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.



तनुश्रीच्या वकिलांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे ४० पानांची कागदपत्र सादर केली आहेत. २००८ साली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही काहीच कारवाई झाली नसल्याचं या कागदपत्रांमध्ये मांडण्यात आलंय.


नानांची प्रतिक्रिया


मी दहा वर्षांपूर्वी जे बोललो होतो, तेच सत्य आहे, अशी प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी या वादावर दिली. मात्र, वकिलांनी सांगितल्यामुळे मी यावर अधिक बोलणार नाही, अशी भूमिका घेत नाना पाटेकर यांनी ही पत्रकार परिषद अवघ्या अर्ध्या मिनिटात आटोपती घेतली.


मला प्रसारमाध्यमांशी बोलायला आवडते. मी नेहमीच तुमच्याशी संवाद साधतो. मात्र, सध्या माझ्या वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलायला मनाई केली आहे. अन्यथा मी कधीच यावर प्रतिक्रिया दिली असती, असे नाना पाटेकर यांनी सांगितले. मी दहा वर्षांपूर्वी बोललो होतो तेच सत्य आहे, असे सांगत नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.