अस्मितेच्या हातावर शिवसेना; अंगावर गोंदवले शिवसेना नेत्यांचे टॅटू
संजय राऊतांच्या घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांमध्ये अस्मिता तळेकर या महिला शिवसैनिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशीसाठी आले होते. जवळपास 10-12 अधिकारी सकाळीच संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले होते. दरम्यान यावेळी संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत असताना त्यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रामक झाले होते.
यावेळी संजय राऊत यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. दरम्यान या संजय राऊतांच्या घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांमध्ये अस्मिता तळेकर या महिला शिवसैनिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तळेकर यांनी आपल्या हातांवर शिवसेना नेत्यांचे टॅटू काढून घेतले होते. इतकंच नाही तर आमचे दैवत असं या टॅटूंच्या सोबत लिहीलं होतं.
अस्मिता तळेकर या भाईंदरहून या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या हातांवर विविध शिवसेना नेते आणि बाळासाहेब ठाकरे यांचा टॅटू काढून घेतला आहे.
यावेळी झी 24 तासशी बोलताना अस्मिता तळेकर म्हणाल्या, "संजय राऊतांचा आवाज ते दाबू शकतील, मात्र त्यांचे लाखो हजारो शिवसैनिक याठिकाणी उभे आहेत. भाजपाने जे गलिच्छ राजकारण केलं आहे. संजय राऊत यांना भाजपमध्ये विलिन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र राऊत हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहे. त्यामुळे कोणीही काहीही केलं तर ते भाजपमध्ये जाणार नाहीत."
अस्मिता तळेकर यांनी त्यांच्या हातांवर शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांचे टॅटू काढले आहे. आणि आता संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी त्या राऊत यांच्या घराबाहेर आल्या आहेत.