मुंबई : कोरोनामुळे जगभरात मोठं थैमान माजलं आहे. कोरोनाचा लोकांच्या जीवनासह संपूर्ण व्यवहारावरही परिणाम होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात सरकारने मॉल, जिम, हॉटेल, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालंय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सरकारने खासगी कंपन्यांना घरुनच म्हणजेच वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केलं आहे.अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा सुरु केल्याने, लोक घरातून बाहेर पडत नाहीयेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झाल्याचा थेट परिणाम ऑटो टॅक्सी, ओला उबर या वाहनचालकांच्या व्यवसायावर होतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय, अनेक वाहन चालकदेखील कोरोनाच्या भीतीने बाहेर पडत नाहीत. हे योग्य असलं तरी अशीच परिस्थिती महिनाभर राहिली तर बँकेचे या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे हफ्ते फेडायचे कसे असा प्रश्न या वाहन चालकांसमोर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व बँका, पतसंस्थांना सरकारी आदेश काढून या दोन महिन्याचे हफ्ते फेडण्यासाठी या सर्व वाहनचालकांना मुदत द्यावी अशी मागणी मनसे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी केली आहे. याप्रकरणी असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मनसेकडून देण्यात येणार आहे.


दरम्यान, जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा फटका विविध घटकांवर बसू लागला आहे. औद्योगिक क्षेत्र, पोल्ट्री व्यावसायिक, येवल्यातील पैठणी व्यवसाय, पर्यटन क्षेत्रावरही याचा परिणाम होत आहे. कोकणासारख्या पर्यटकस्थळी सध्या ६० ते ७० टक्क्यांनी पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक देखील चिंतेत आहेत.