Western Railway : पश्चिम रेल्वेवरील (WR) एका टीसीने (TC) गेल्या वर्षभरात 130000 हजार फुकट्या प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडलं आहे. 2022 मध्ये या टीसीने दररोज 36 प्रवाशांना विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना (Travel without ticket) पकडून तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 कोटींहून अधिक दंडांची वसूली
 
"जाहिद के कुरेशी (उपमुख्य तिकीट निरीक्षक) यांनी पश्चिम रेल्वेवर एका वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक तिकीट तपासणी करताना दंड वसूल केला आहे. कुरेशी यांनी 2022 मध्ये 11,684 तिकिटांशिवाय प्रवास करणार्‍या व्यक्तींकडून आणि 1,432 अनियमित प्रवाशांकडून 1 कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे," असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे जाहिद कुरेशी यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये 21.41 लाख रुपयांचा सर्वोच्च मासिक दंड वसूल केला होता. हा  एक विक्रम आहे.


अनेक पुरस्कारांनी सन्मानित


जाहिद कुरेशी हे त्यांच्या कामाच्या सुरुवातीपासूनच मेहनती आणि कठोर परिश्रमासाठी ओळखले जातात. त्याला अनेक DRM,PCCM पुरस्कार आणि GM पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई सेंट्रल विभागात पाच वेळा कुरेशी यांना 'मॅन ऑफ द मंन्थ' म्हणून घोषित करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.


वडिलांकडून घेतली प्रेरणा


"माझे वडील पश्चिम रेल्वेसाठी तिकीट तपासनीस म्हणून काम करत होते. ते ग्रँट रोड येथे विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांना रेल्वे मंत्रालयाचे पुरस्कार आणि अनेक महत्त्वाचे पुरस्कार देखील मिळाले आहे. त्यांच्यामुळेच मला आणि माझ्या भावांना तिकीट तपासक (TC) म्हणून भारतीय रेल्वेमध्ये सामील होण्यासाठी प्रेरणा मिळाली," असे कुरेशी यांनी म्हटले आहे. 


"आम्ही चौघे भाऊ 1995 मध्ये रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) परीक्षेसाठी बसलो आणि उत्तीर्ण झालो. त्यांपैकी तिघेजण पश्चिम रेल्वेत टीसी म्हणून तर एक जण सहाय्यक लगेज कारकून म्हणून रुजू झालो, जाहिद असेही कुरेशी म्हणाले.


"बहुतेक प्रवाशांना दंड भरायचा नसतो. त्यांना दंड भरवण्याचे महत्त्व पटवून देणे हे टीसीसाठी सर्वात मोठे आव्हान असते. बर्‍याच वेळा आम्ही पटकन रागावणाऱ्या विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भेटतो आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी खूप संयम लागतो. आम्हाला त्यांच्याशी डोकं शांत ठेवून सामोरे जावे लागते. पण सावधही राहावे लागते," असे कुरेशी यांनी म्हटले आहे.


दुसरीकडे, मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल, एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली होती. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत 135.58 कोटी दंड वसूल केला आहे.