सीएसएमटी स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याला टीसीने डांबून ठेवलं
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुंबई : कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला तिकीट तपासणीसानं डांबुन ठेवल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीतून वडाळ्याला आणायचे होते. त्यासाठी वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्य़ातले श्याम शेळके लोकलनं सीएसएमटीला पोहचले. त्यावेळी तपासणीस रुचिता घुले यांनी शेळकेंना तिकीट मागितले.
कर्तव्यावर असल्याचं शेळके यांनी सांगितलं, पण घुले यांनी शेळकेंना इतर विनातिकीट प्रवाशांसोबत ठेवलं. शेळकेंनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीनंतर शेळकेंची सुटका झाली. चौकशीनंतर घुलेंवर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल.