मुंबई : शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवला जाईल, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला दिला आहे. मातोश्रीवर शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेची भूमिका पहिल्या दिवसापासूनतच ठाम आहे, त्यात कोणताही बदल झालेला नाही असंही राऊत म्हणाले. २०१४ आणि २०१९ मध्ये फरक आहे. दहशतवाद, धमक्या याचा वापर चालणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे भाजपा-शिवसेनेमधील दरी रोज वाढत असताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा, अशी ठाम भूमिका शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत घेण्यात आली. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला प्राधान्य असेल. मात्र भाजपनं मुख्यमंत्रिपदाची अट मान्य केली नाही तर अन्य पर्यायांचा विचार केला जाईल, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आल्याचं समजतं आहे. 


स्वतःहून युती तोडण्याची इच्छा नाही. भाजपनं जे ठरलंय त्याप्रमाणं करावं. भाजपनं निर्णय घ्यावा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितलं. दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांना तसंच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना तूर्तास वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मातोश्रीवरील बैठक आटोपून शिवसेना आमदार रंगशारदाला पोहोचलेत.. भाजपनं अडीच वर्षांसाठी शिवसेना मुख्यमंत्रिपद द्यावं, अन्यथा पाच वर्षं शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असं शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं.