कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'तेजस्विनी' बस योजनेंतर्गत मुंबई शहरात गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना सोयीस्कर व सहज प्रवास घडविण्यासाठी ३७ मिडी-बिगर एसी बसगाड्यांची खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत एकमताने पास केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'व्हीई कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड' या कंपनीकडून बेस्ट उपक्रम ३७ बसगाड्या तेजस्विनी बस योजनेसाठी खरेदी करणार आहे. त्यासाठी या कंपनीला बेस्ट १० कोटी ९१ लाख रुपये मोजणार आहे. 


वास्तविक, शासनाने एक वर्षांपूर्वीच बेस्टला या बसगाड्या खरेदीसाठी ११ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यामध्ये ३० बसगाड्यांची खरेदी करणे अपेक्षित होते. मात्र बेस्टने संपूर्ण निधीचा वापर बसगाड्यांच्या खरेदीसाठी करण्याच्या हेतूने आता ३७ बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.


या बसगाडयांचा पुरवठा करण्यासाठी टाटा मोटर्सनेही निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. मात्र, त्यांनी निविदेत भरलेली रक्कम ही जास्त असल्याने त्यांना ते कंत्राट न देता 'व्हीई कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड' या कंपनीकडून या बसगाड्या १०.९१ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा निर्णय घेतला.



इलेक्ट्रीक गाड्या का नाहीत?


मात्र, या प्रस्तावावर बोलताना भाजपचे अभ्यासू सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्या हटवादी भूमिकेमुळे या बसगाड्यांची खरेदी करण्यास एक वर्षाचा विलंब झाल्याचा थेट आरोप केला. तसेच आज जगभरात प्रदूषण टाळण्यासाठी डिझेल व पेट्रोलवरील बसगाड्यांची खरेदी करण्यात येत नसताना बेस्ट उपक्रम डिझेलवर धावणाऱ्या या बसगाड्या का खरेदी करीत आहे? इलेक्ट्रिक बसगाड्या का खरेदी करीत नाही? असा सवाल करीत गणाचार्य यांनी बेस्ट प्रशासनावर तोफ डागली.


यावेळी, बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केवळ शहर भागातच या तेजस्विनी बसगाड्याची सुविधा न देता बेस्टच्या सर्वच बस डेपोमध्ये किमान एक बसगाडीची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचना केली.