#हुडहुडी : मुंबईचा पारा आणखी खाली जाणार
खबरदारी घेण्याचा इशारा
मुंबई : देशाच्या उत्तरेकडे असणारी थंडीची लाट काही केल्या कमी होत नाही आहे. त्यातच आता मुंबईतही हिवाळा चांगलाच जोर पकडत आहे. हवामान खात्यकडून नुकत्याच देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारची रात्र ही यंदाच्या मोसमातील सर्वाधिक थंड रात्र असणार आहे.
तापमान कमी होत असल्यामुळे आणि सोसाट्याचा वारा असल्यामुळे थंडी जास्त वाढण्याची चिन्हं स्पष्ट आहेत. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या वेळी तापमान आणखी खाली घसरणार असून, हा आकडा १४ ते १५ अंश सेल्शिअसपर्यंत जाईल.
वाहत्या वाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामुळे गारवा वाढलेला असेल. शुक्रवारी सकाळपर्यंत हा गारठा कायम राहणार आहे. मुंबईत अचानक वाढणारी थंडी पाहता हवामान खात्याकडून शहरातील नागरिकांसाठी काही सल्ले दिले आहेत. सकाळच्या वेळी मुंबईत मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांनी यावेळी जास्त काळजी घेण्याचं सांगण्यात आलं आहे. मुळात मॉर्निंग वॉकला जाणं टाळा असंही सांगितलं गेलं आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिकांनीही या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.