मुंबई : भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची मुंबईत प्रदेश कार्यालयात बैठक सुरू आहे. शिवसेना भाजपत फॉर्म्युलावर सहमती होत नाही. तसेच भाजपचा फॉर्म्युला शिवसेनेने फेटाळला आहे. त्यामुळे युतीतला तणाव चांगलाच वाढला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. युतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि जागावाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने भाजपचा प्रस्ताव फेटाळल्याने या पार्श्वभूमीवर आता भाजपचे बैठकांचे सत्र सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्यासहल पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. 


आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार करावा, प्रचारात प्रमुख मुद्दे कोणते असावेत याविषयी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र युतीच्या भवितव्यावर संकट घोंघावत असताना सुरू असलेल्या या बैठकीला महत्त्व आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह २२ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. त्यावेळी युतीबाबत भाष्य होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना जास्त जागांवर अडून राहिली तर युतीचे काही खरे नाही, अशी राजकीय चर्चा आहे.