दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात कोरोना संकट पुन्हा डोकं वर काढत आहे. कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. कोरोनाचं संकट समोर असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन यावर चर्चा सुरू होती. मात्र आता परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावी, बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. 


कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हतं. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. 



त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा बोर्डाचा आग्रह आहे. 15 दिवसांनंतर राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन परीक्षांबाबत शिक्षण विभाग निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यात दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी बसले आहेत.