मुंबई : देशात दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून खूप मोठा कट रचला जात होता. पण हा नापाक कट दिल्ली पोलीस आणि यूपी एटीएसने मिळून उघड केला. दहशतीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने वेळीच उघड केले आणि देशाला मोठ्या संकटापासून वाचवले. दिल्ली पोलिसांनी काल 6 दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर मुंबई शहर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा त्यांचा इरादा होता, त्यासाठी दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती, अशी माहिती समोर आली आहे.


एक दहशतवादी मुंबईतल्या धारावीमधला


अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांमध्ये मुंबईच्या जान मोहम्मद शेखचाही समावेश आहे. जान मोहम्मद धारावीत राहातो. जान मोहम्मद ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचं त्याचा मित्र फैय्याज हुसैननं सांगितलंय. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जान मोहम्मद शेखच्या कुटुंबीयांची मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली. कालच्या चौकशीनंतर आज जान मोहम्मद शेखच्या पत्नीला आणि मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन गेले.  जान मोहम्मद शेखला मदत करणा-याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.ताब्यात घेतलेली व्यक्ती शेखला मुंबईहून रेल्वेचं तिकीट काढून देणारा ट्रॅव्हल एजंट अजगर होता.  मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रॅंन्चने त्याला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली आणि त्याला सोडून दिलंय. जान मोहम्मद शेखने 13 सप्टेंबरला मुंबई सेंट्रलहून दिल्लीला तिकीट बुक केलं होतं. अजगर हा जान मोहम्मद शेखच्याच परिसरात राहतो.


पाकिस्तानात प्रशिक्षण


अटक केलेल्या आरोपींपैकी आरोपी झीशान कमर आणि ओसामा यांनी पाकिस्तानात दहशतवाद्यांचे प्रशिक्षणही घेतले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम या अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताला हादरवून टाकण्याचा प्रयत्न करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम पाकिस्तानात लपून बसला आहे आणि तो हा संपूर्ण कट रचण्यात व्यस्त आहे.