Mumbai News : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी एक दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी (Balasaheb Thackeray memorial) आले होते. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा (Shiv Sena Clash) झाल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी काही वेळ तणावाचं वातावरण पहायला मिळालं. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गद्दार...गद्दार...अशी घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी मोर्चा सांभाळला अन् कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.



नेमकं काय झालं?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली, ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील तिथेच उपस्थित होते. त्याचवेळी उपस्थित असलेले शिंदे गटाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले. शिंदेंच्या भेटीनंतर स्मृतीस्थळ गोमुत्राने धुणार असल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्मृतीस्थळावरून निघून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई दाखल झाले.


बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांचा उद्या स्मृतीदिन आहे. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथे विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विघ्न येऊ देणार नाहीत, असं अनिल देसाई यांनी म्हटलंय. तर शिंदे गटाने देखील आक्रमक भूमिका मांडलीये. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुणी शुद्धीकरण करणार असेल तर हे कोण आहेत, कोणाचे दलाल आहेत, शरद पवारांचे दलाल आहेत? शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम केलं. पण ती ज्योत हे विझवण्याचं काम करत आहेत आणि इथे कशासाठी येत आहेत?, असं आमदार सदा सरवणकर यांनी म्हटलंय.