MAHARASHTRA UNLOCK : राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल
निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यात दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार
मुंबई : राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची सही होताच एक-दोन दिवसांत याचा जीआर निघेल. मुख्यमंत्र्य़ांची टास्क फोर्सबरोबर आज बैठक झाली. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय.
दरम्यान, उर्वरीत 11 जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. तिथे रुग्णसंख्या वाढल्यास किंवा परिस्थिती बिघडल्यास त्या ठिकाणी स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध अधिक वाढवण्याचा देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.