मुंबई : महाराष्ट्र विकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधी काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आले आहे. खातेवाटपात काँग्रेसला ग्रामीण भागाशी संबंधित एकही महत्त्वाचे खाते मिळालेले नाही. कृषी, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा या चार महत्वाच्या खात्यापैकी एकही खाते काँग्रेसकडे नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खातेवाटपाच्या चर्चेत याबाबत ठोस भूमिका न मांडल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. ग्रामीण भागाशी संबंधित एखादे जादा खाते पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा खटाटोप सुरू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन महिना पूर्ण झाला असला तरी तिन्ही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असला तरी खातेवाटपावरून पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरू झाली आहे. ग्रामीण भागाशी संबंध असलेलं एकतरी खातं मिळावं, असं काँग्रेसला वाटत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांचं सरकार बनले खरे, पण सरकारचा मार्ग वाटतो तितका सुकर नाही. 


वर्षानुवर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेनं गाठ बांधली आहे. मात्र या संसारात पदोपदी अडचणी येत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. मात्र या सरकारचं खातंवाटप व्हायला बराच कालावधी जावा लागला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती मंत्रीमंडळ विस्ताराची. तारीख पे तारीख करत आता अखेरीस ३० डिसेंबरचा मुहूर्त ठरला आहे. मात्र या विस्ताराआधी पुन्हा एकदा खातेवाटपावरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत. 


ग्रामीण भागाशी निगडीत एकही महत्त्वाचं खाते काँग्रेसला मिळालेले नाही. ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडणारी ग्रामविकास आणि जलसंपदा ही खाती राष्ट्रवादीकडे तर कृषी आणि सहकार ही खाती शिवसेनेकडे आहेत. खातेवाटपाच्या चर्चेत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही बाब नजरेआड केल्यामुळे काँग्रेसचे काही नेते खासगीत नाराजी व्यक्त करतायत. त्यामुळे आता एखादं जास्तीचं खातं पदरात पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.



महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरू असल्याने विरोधकांच्या हाती चांगलंच कोलीत मिळाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणण्याची संधी सोडली नाही. काँग्रेसच्या या भूमिकेवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय तोडगा काढतात याकडे लक्ष आहे. 


काँग्रेस, राष्ट्रवादीने १९९९ ते २०१४ या काळात सत्तेत असताना अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. आता सत्तेचे वाटप तीन पक्षात आहे. त्यामुळे सहाजिकच काही महत्त्वाची खाती या दोन पक्षांच्या हातून गेलीत. त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत जादा खाती पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे.