दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याला प्रतिक्षा असलेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकारकडून खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी असलेली सहा मंत्र्यांची खातेनिहाय यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे समजते. आता यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर सरकारकडून आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, या शपथविधीला १३ दिवस उलटून गेल्यानंतरही खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे महाविकासआघाडीत सर्व काही आलबेल आहे ना, अशी चर्चा सुरु झाली होती. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काही खात्यांवरून रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटप रखडला होता. परंतु, आता यावर तोडगा निघाला असून खातेवाटप निश्चित झाले आहे. 



सूत्रांच्या माहितीनुसार, कालपर्यंत गृहखाते शिवसेनेकडेच राहील, असे सांगितले जात होते. मात्र, अंतिम क्षणी यामध्ये बदल झाल्याचे समजते. त्यानुसार उपमुख्यमंत्रिपदाची तसेच गृहमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांच्याकडे सोपविली जाणार आहेत. तर शिवसेनेला नगरविकास, उच्च व तंत्र शिक्षण, जलसंपदा, राज्य रस्ते विकास महामंडळ, परिवहन, उद्योग, सामान्य प्रशासन, विधी, सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा अशी दहा मंत्रालये मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गृह, अर्थ, ग्रामीण विकास, सहकार, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण आणि कामगार अशा विभागांची जबाबदारी येणार आहे. काँग्रेसला महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण तसेच महिला आणि बालकल्याण मंत्रालये सोपविली जाणार आहेत.