कपिल राऊत, झी 24 तास,ठाणे: पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला होऊन दोन महिने उलटले नाहीत. आता पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी सुरू झाली आहे. आज पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी ठाण्यात पाहाला मिळाली. फेरीवाल्याने चक्क सुरी काढून गळा कापण्याची धमकी दिली आहे. यामुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चितळसर येथे पालिका आयुक्तांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर कारवाईसाठी कर्मचारी आलेले असताना ही घटना घडली. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हातातली सूरी  उगारून गळा कापण्याची धमकी फेरीवाल्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.


"एकाची बोटं कापली आहेत, आता तुझी गर्दन उडवेन" अशी धमकीच फेरीवाल्याने पालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी काशिनाथ राठोड यांना दिली आहे. पातलीपाडा येथील शरणम् सोसायटी जवळ मोकळ्या जागेत फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे पालिकेचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेले.


त्या ठिकाणी खोबरे विकणारा फेरीवाला कर्मचाऱ्यावर संतप्त झाला आणि खोबरे कापण्यासाठी वापरणारा सुरा घेऊनच कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावला. सुदैवाने इतर कर्मचारी आले आणि राठोड हे बचावले. त्यामुळे काशिनाथ राठोड हे दुसऱ्या दिवशी कामावरच आले नाहीत. या घटनेमुळे त्यांचा रक्तदाब वाढला आहे आणि त्यांना मोठा मानसिक ताण देखील सहन करावा लागला.


राठोड हे घडलेल्या परिस्थितीतून सावरले आहेत. राठोड यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात संबंधित मुजोर फेरीवाल्याविरोधात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला. या मुजोर फेरीवाल्यावर सरकारी कामात अडथळा आणणे,जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारचे गुन्हे कासारवडवली पोलिसांनी दाखल केले असुन पोलीस आता या फेरीवल्याचा शोध घेत आहेत.


'अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवर आता कारवाई करत असताना एका प्रकारची दहशत आमच्यावर असते, अशा मुजोर फेरीवाल्यांमुळे आमच्या जीवाला धोका असल्याने पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने कारवाई दरम्यान आमची सुरक्षा वाढवावी त्यामुळे असे प्रकार घडणार नाहीत', अशी प्रतिक्रिया काशिनाथ राठोड यांनी दिली आहे.