Thane Crime : धक्कादायक! `मुंबई श्री` संकल्पने जन्मदातीला संपवलं; स्टेरॉईडच्या अतिवापराने घेतला आईचा बळी, तर वडील रुग्णालयात
Thane Crime : आई वडिलांवर सपासर वार केल्यानंतर आरोपी संकल्पने घरातून पळ काढला होता. त्यानंतर काही वेळानेच ठाणे पोलिसांनी आरोपीला कुर्ल्याच्या नेहरुनगरमधून ताब्यात घेतले आहे. शुल्लक वादातून आरोपीने आईची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
Thane Crime : ठाणे (Thane News) पश्चिम येथील कासारवडवली भागात गुरुवारी सकाळी 11.15 च्या सुमारास 35 वर्षीय मुलाने वडिलांवर आणि आईवर निर्घृणपणे वार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला आहे. तर वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ठाण्यातील वेदांत रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून मुंबई श्री राहिलेल्या संकल्प भाटकरने आपल्याचा आई वडिलांवर निर्घृणपणे चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात आई विनिता भाटकर (66) यांचा मृत्यू झाला तर वडील विलास भाटकर (72) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आई वडिलांवर हल्ला केल्यानंतर संकल्पने घरातून पळ काढला होता. मात्र ठाणे पोलिसांनी त्याला कुर्ल्यातील नेहरु नगर येथून ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कासारवडवली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी सांगितले की, "संकल्प भाटकर नावाच्या ३५ वर्षीय व्यक्तीने गुरुवारी सकाळी वडिलांवर आणि आईवर चाकूने वार केले. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा बॉडीबिल्डर असून तो स्टेरॉईड्स घेत होता. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे तो मानसिकदृष्ट्या कमजोर झाला होता. तीन महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. पण वडील, आई आणि पत्नी यांच्याशी त्याचे सातत्याने भांडण होत होते. स्टिरॉइड्सच्या सेवनामुळे आलेल्या निराशेमुळे त्याचे आई-वडील त्याला ते घेण्यासपासून थांबवते होते.
"संकल्प भाटकर शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेत होता. त्याने 2019 मध्ये बॉडीबिल्डिंगसाठी मुंबई श्री पुरस्कारही जिंकला होता. मात्र, गेल्या वर्षी त्याने स्टिरॉइड्स आणि ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. गुरुवारी संकल्पने कटरने वडिलांवर आणि आईवर वार केले. हल्ल्यानंतर तो कटरला धरून बाहेर पडला आणि ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कोरल हाईट्स इमारतीच्या दिशेने निघाला," अशी माहिती संकल्पच्या शेजाऱ्यांनी दिली.
सासू सासऱ्यांच्या घरून आरोपीला अटक
"आईवडीलांवर वार केल्यानंतर संकल्प भाटकर याने ठाण्यातील कोरल हाइट्स येथे राहणाऱ्या बहिणीला शोधून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती त्याला सापडली नाही. त्यानंतर तो बाईकने कुर्ला नेहरू नगर येथील सासू व सासऱ्यांच्या घरी गेला होता. मात्र कासारवडवली पोलिसांनी संकल्प भाटकर यांच्याबाबत सोशल मीडियावर माहिती दिल्याचे समजताच त्यांनी दरवाजा उघडला नाही. तितक्यात कासारवडवली पोलिसांनी नेहरूनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर नेहरु नगर पोलिसांनी संकल्प भाटकर याला अटक करून ताब्यात घेतले. संकल्पवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली आहे.