Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखा अद्याप जारी झाल्या नसल्या तरीही काही दिवसांतच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याचं आश्वासक वक्तव्य अनेक मोठ्या नेतेमंडळींनी केलं आहे. त्यामुळं निवडणुका खऱ्या अर्थानं तोंडावर आल्या आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. इथं निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच राज्यात आणि राज्यातील काही महत्त्वाच्या भागांमध्ये नेतेमंडळींसह प्रशासनाकडून अनेक विकासकामांचं आणि प्रकल्पांचं लोकार्पण केलं जात आहे. तर, काही भागांमध्ये भविष्यातील विकासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या घोषणाही केल्या जात आहेत. ठाणेकर आणि त्यांचं ठाणेही यास अपवाद नाही. (Thane news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुका दृष्टीक्षेपात असतानाच ठाण्यातील पायाभूत सुविधांअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांसाठीची निविदा प्रक्रिया लावण्याचा धडाका MMRDA कडून लावण्यात आला आहे. अवघ्या आठलड्याभराच्या कालावधीत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यासाठी एमएमआरडीए म्हणजेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीनं तब्बल 10 हजार 220 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा काढल्या आहेत. 


कोणकोणत्या कामांसाठी काढण्यात आल्या आहेत या निविदा? 


- कासारवडवली ते खारबाव खाडीपूलासाठी 1453 कोटी रुपयांची तरतूद 
- ठाणे कोस्टल रोड बाळकुम ते गायमुख सागरी मार्ग, 2597 कोटी रुपये 
- पूर्व द्रूतगती मार्गाचा छेडानगर ते ठाणे विस्तार, 2560 कोटी रुपये 
- कल्याण रिंग रोड प्रकल्पातील रुंधे रोड ते गोवेली रस्ता 31 कोटी रुपये 
- गायमुख ते पायेगाव खाडीपूल, 929 कोटी रुपये 
- कोलशेत ते खाडीपूल, 274 कोटी रुपये 
- राष्ट्रीय महामार्ग 4 ते कटई नाका उन्नत मार्ग, 1887 कोटी रुपये 
- ओवळा माजिवाडा मतदारसंघातील रस्त्यांची कामं, 490 कोटी रुपये 


वरील सर्व प्रकल्पांसाठी एमएमआरडीएनं बांधकामासाठी कंत्राटदार आणि सल्लाहार नियुक्तीच्या निविडा जारी केल्या आहेत. 


हेसुद्धा वाचा : RBI कडून दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई; खातेधारकांवर काय होणार परिणाम? 


ठाण्यालाही मिळणार कोस्टल रोड.... 


ठाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता त्यावर आता युद्धपातळीवर काम सुरु आहे. बाळकुम ते गायमुखपर्यंतचा कोस्टल रोड हा त्याचाच एक भाग. या साधारण 13 किमी अंतराच्या सागरी मार्गासाठी एमएमआरडीएकडून निविदा काढण्यात आल्या होत्या. उपलब्ध माहितीनुसार बाळकुमजवळील खारेगाव येथून हा मार्ग सुरु होणार असून, घोडबंदर रस्त्यावरील गायमुख भागापर्यंत जाणार आहे. साधारण तीन वर्षांमध्ये ठाणेकरांचा हा कोस्टल रोड बांधून पूर्ण होणार असल्याचा मानस बाळगण्यात येत आहे. वरील सर्वच विकासकामांमुळं शहर नव्यानं आकारास येणार आहे, एका अर्थी ठाणेकरांच्या समस्यांवर तोडगा निघणार असून, त्यांच्या जीवनशैलीमध्ये खऱ्या अर्थानं बदल होणार आहेत असं म्हणणं गैर ठरणार नाही.