आता ठाणेकरही करणार डबल डेकर बसनं प्रवास; `या` बालकलाकाराच्या मागणीमुळं शक्य होतंय हे
Thane News : ठाणेकरांना एक खास आणि तितकीच मोठी भेट मिळवून देणारा हा बालकलाकार नेमका आहे तरी कोण? पाहा त्यानं असं कोणतं काम केलं की, सर्वत्र होतेय वाहवा!
Thane News : ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मेट्रो आणि तत्सम प्रकल्पांमुळं या शहराचा विकास नेमका किती वेगानं होत आहे हेच पाहायला मिळतंय. मोठमोठ्या इमारती, बिझनेस पार्क आणि अशा अनेक कारणांमुळं प्रकाशझोतात असणाऱ्या ठाण्याचा सर्वांगीण विकास होत असतानाच आता ठाण्यातील नागरिकांचा प्रवास आता अधिक समृद्ध होणार आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे ठाणेकरांच्या सेवेत येणारी एक कमालीची सुविधा.
ठाणेकरांसाठी नवी सुविधा?
ठाण्यातीलच एका बालकलाकाराच्या विनंतीपर मागणीचा विचार केल्यानंतर आता इथं चक्क डबल डेकर बस धावणार आहेत. ठाण्यातील बालकलाकार अथर्व वगळ नं 2023 च्या सप्टेंबर महिन्यात ठाणे महानगरपालिका आयुक्त विलास जोशी यांची भेट घेऊन महानगरपालिका क्षेत्रात / परिसरात प्रवाशांच्या सुविधेला केंद्रस्थानी ठेवत टीएमटी बसच्या ताफ्यामध्ये मुंबईतील डबलडेकर बेस्ट (BEST) बसेस प्रमाणं 'प्रदूषण विरहीत वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर' मोठ्या प्रवासी वाहक क्षमतेच्या बसेस ठाणे शहरात उपलब्ध करुन द्याव्यात अशी विनंतीवजा मागणी केली होती.
हेसुद्धा वाचा : Mumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण
अथर्वनं लेखी स्वरुपात केलेल्या या मागणीची अखेर दखल घेतली जाणार असून, टीएमटी प्रशासनाने अर्थसंकल्पात ठाणेकरांना डबल डेकर बस देण्याची घोषणा केली आहे. त्यासोबतच बस तिकिटात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करण्याचीही घोषणा केली आहे. थोडक्यात आता मुंबईच्या रस्त्यांप्रमाणं ठाण्याच्याही रस्त्यांवर ही डबलडेकर बस दिमाखात धावणार आहे.
ठाणेकरांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी धडपडणाऱ्या टीएमटी प्रशासनाकडून गुरुवारी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ठाणेकरांना डबल डेकर बस देण्याची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्पात बस तिकिटात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करता परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी सन 2023-24 चे 427 कोटी 19 लाखांचे सुधारित आणि 2024-25 या आर्थिक वर्षाचे महसुली व भांडवली खर्चासह 694 कोटी 56 लाख रकमेचे वास्तववादी आणि काटकसरीचे अंदाजपत्रक सभापती विलास जोशी यांना सादर केले.