दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भूखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत. बिल्डर हिताचे निर्णय घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज केली. या आरोपानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील मौजे बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी एक भूखंड राखीव होता. शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांनी खेळाच्या मैदानाची ही जागा हडप करून आपली असल्याची दाखवली. या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेकडून प्रस्तावही मंजूर करून घेतला. मात्र याबाबत तक्रार झाल्यानंतर भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड यांनी ही जमीन खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे आणि मोजणीत आपली चूक झाल्याचे मान्य केले. तेव्हा महसूल अधिकाऱ्यांनी शिवप्रिया रिअॅलिटर्सच्या प्रकल्पाला स्थगिती दिली. 


मात्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही जमीन शिवप्रिया रिअॅलिटर्स असल्याचा निकाल दिला. त्या जमिनीवर 300 कोटीचा प्रकल्प बिल्डरने उभा केला आहे. 


दुसरीकडे पुण्यातील हवेली तालुक्यातील मौजे केसनन येथील २३ एकर म्हातोबा देवस्थानची इनामी जमीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल छुगेरा प्रॉपर्टीज लिमिटेड यांना खरेदी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. महसूलमंत्र्यांच्या सहमतीने हवेली तालुक्यातील हा भूखंड विकला गेला. या व्यवहारात शासनाला मिळणारा नजराणा स्वरुपातील ४२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे. 


सर्व कायद्याचे उल्लंघन करून महसूल मंत्र्यांनी हा निकाल दिला असून २३ एकर जमीनीची किंमत २५० ते ३०० कोटीच्या घरात आहे. जयंत पाटील यांनी विधानसभेत हे आरोप केल्यानंतर स्वतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यास आक्षेप घेतला. अर्धन्यायिक अधिकारात आपण हे निर्णय घेतले असून त्यावर विधानसभेत आरोप करता येत नाहीत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपच्या आमदारांनीही याप्रकरणी गोंधळ घालत हे आरोप कामकाजातून काढून टाकावेत अशी मागणी केली. 


या मागणीनुसार विधानसभा अध्यक्षांनी हे आरोप कामकाजातून काढून टाकले. त्यामुळे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रांसह हे आरोप आपण करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. आपल्याकडे अजून एक भूखंड घोटाळ्याचे प्रकरण असून ते आपण उद्या उघड करू असा इशाराही जयंत पाटील यांनी केला आहे.


आतापर्यंत विधानसभेत जे जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अर्ध न्यायिकच होते. खडसेंवर झालेले आरोपही अर्धन्यायिक प्रकरणातच होते. मी केलेले आरोप कामकाजातून काढून टाकले ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.