Maharashtra Politics, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि लक्षवेधी घडामोड घडणार आहे. लवकरच महाराष्ट्रात नवी युती पहायला मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र येणार आहेत. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी  वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीची घोषणा होणारं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते युतीची घोषणा करणार आहेत. यानिमित्ताने शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा प्रयोग राज्यात पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीशी युतीसाठी आपण तयार आहोत पण काँग्रेस राष्ट्रवादीशी बोलणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. त्यावर लोकशाही वाचवण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर चांगलंच आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी दिली. तर, वंचित-ठाकरे गट युतीची उद्या घोषणा होईल असं ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईंनी म्हटल आहे.


युती संदर्भात बोलणी चालू आहे. ठाकरे यांच फायनल झालं की घोषणा होईल ठाकरे यांना वाटते की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊ जेव्हा त्यांची बोलणी झाली की मग निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी दिला होता युतीचा प्रस्ताव


प्रकाश आंबेडकर यांनी दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडे युती संदर्भातील प्रस्ताव दिला होता. यामुळे मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर यांची शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी याबाबत कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. अखेर उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.